मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला शनिवारी सुरुवात केली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. बी.एड अभ्यासक्रमाच्या ३४ हजार ८३० जागांसाठी ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. सीईटी कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यानुसार मागील काही दिवसांपासून प्रवेश प्रक्रियांना सुरुवात करण्यात येत आहे. १२ जुलै रोजी सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर १३ जुलैपासून बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बी.एड अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने दरवर्षी या अभ्यासक्रमाला मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जाते. त्यानुसार यंदा ३४ हजार ८३० जागांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी ७८ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बी.एड या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी कक्षाकडून १३ जुलैपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १३ ते २० जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत कागदपत्रांची छाननी करून अर्ज निश्चित करायचा आहे. १६ जुलै रोजी तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जुलैपर्यंत विद्यार्थांना यादीसंदर्भात तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, २ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. हेही वाचा - मिहीर शहाचा चालक परवाना रद्दची शिफारस! मुंबई पोलीस लिहिणार ‘आरटीओ’ला पत्र हेही वाचा - ११ वर्षे प्रलंबित खड्ड्यांशी संबंधित प्रकरणाला पूर्णविराम मिळणार; समस्येसाठी यंत्रणांचा निष्काळजपणा जबाबदारच, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती बी.एडप्रमाणे मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या अभ्यासक्रमांच्या फक्त २४ जागा असून, १३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. दरम्यान, सीईटी कक्षाकडून शुक्रवारी सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. यामध्ये एमबीए/एमएमएस, बी. डिझाईन, बी. फार्मसी, बीएड-एमएड, बी.पी.एड, एम.पी.एड आणि एम.एड या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.