काळी-पिवळी आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सीच्या चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी ताडदेव आरटीओने एक पाऊल पुढे टाकले असून दक्षिण मुंबईतील प्रवाशांनी हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींची दखल घेत ताडदेव आरटीओने १५ पैकी पाच टॅक्सीचालकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

दक्षिण मुंबईत काळ्या-पिवळ्या आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सींच्या चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी यासाठी ताडदेव आरटीओने हेल्पलाईन क्रमांक ९०७६२०१०१० उपलब्ध केला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेण्यात येत असून दोषी चालकाचा वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी ताडदेव आरटीओने तीन अधिकाऱ्याचे विशेष पथक नेमले आहे. त्या पथकाला एक वाहन, मोबाइल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा आदी उपलब्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा : तीन वर्षांनंतर मुंबईत मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन

ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत हेल्पलाईन क्रमांकावर १५ प्रवाशांनी तक्रार केली आहे. यापैकी १० तक्रारींचे तात्काळ घटनास्थळीच निवारण करण्यात आले. तर पाच प्रकरणांमध्ये चालकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. भविष्यात ही कारवाई सुरूच राहणार आहे.
प्रवाशांना रात्री-अपरात्री टॅक्सीचालकांशी संबंधित समस्या भेडसावल्यास त्याबाबत mh01taxicomplaint@gmail.com या ई-मेलवरही पुराव्यानिशी तक्रार दाखल करता येणार आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधी फोन करून किंवा व्हॉटसॲप, मोबाइलवरून थेट संदेश पाठवून तक्रार करता येणार आहे. दरम्यान, टॅक्सीचालकांसाठी रेल्वे स्थानक आणि टॅक्सी थांब्यांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या जनजागृती मोहिमेत पाच हजार चालकांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.