वादग्रस्त अभिनेता आदित्य पांचोली याच्यावर घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांचोलीच्या इमारतीत राहणाऱ्या इसमाने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्सोवा येथे राहणाऱ्या आदित्यचे याच इमारतीत राहणाऱ्या भार्गव पटेल यांच्याशी गेल्या दोन महिन्यांपासून वाद होते. पटेल यांच्या घरातून आवाज येत असल्याचा आरोप करत पांचोलीने त्यांना यापूर्वीही घरात घुसून शिविगाळ आणि मारहाण केली होती. त्यामुळे पटेल यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले होते. मंगळवारी रात्री पुन्हा याच कारणावरून पांचोलीने पटेल यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. ते सीसीटीव्ही फुटेज पटेल यांनी पोलिसांना सादर केले. त्यावरून पांचोली याच्यावर बेकायदेशीरपणे घरात प्रवेश व मारहाणीचा गुन्हा झाला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.