कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी, या दृष्टीकोनात कोकण रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेण्यास सुरू केलेल्या एसएमएस सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सेवेवर पाच दिवसांतच ५१ एसएमएस आले होते. त्यापैकी ११ तक्रारी रास्त होत्या. तर बहुतांश प्रवाशांनी या एसएमएस सेवेचा वापर तक्रारींऐवजी रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यासाठी केला. पण या सहाय्यक क्रमांकावर केवळ तक्रारींचीच दखल घेतली जाणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सेवेबद्दल कोणत्याही तक्रारी असतील, तर त्यांनी ९००४४७०७०० या क्रमांकावर एसएमएस कराव्यात, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले होते.  मध्य किंवा दक्षिण रेल्वे या विभागांतील चार तक्रारी कोकण रेल्वेकडे आल्या.
अर्धागवायू झालेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने कारवार भागातून एक एसएमएस करून  या व्यक्तीने असनोटी स्थानकावर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनऐवजी एकवर घेता येईल का, अशी पृच्छा केली होती. कोकण रेल्वेने या व्यक्तीच्या भावनांची दखल घेत ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली. या क्रमांकावर दूरध्वनी कॉल करू नये, असेही त्यांनी आवाहन केले आहे.