मुंबई: जलजीवन मिशन योजनेंतर्गत येत्या दोन वर्षांत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा केला जाईल. त्यासाठी पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावीत आणि खेडय़ापाडय़ातील जनतेला दिलासा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जलजीवन मिशन ही योजना केंद्र आणि राज्याच्या भागीदारीतून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे कमीत कमी ५५ लिटर प्रति माणसी, प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरविले जाणार आहे. करोनामुळे तसेच स्टील, सिमेंटच्या भाववाढीमुळे गेली दोन वर्षे या योजनेतील अनेक कामे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा आढावा घेताना सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वागीण विचार होणे गरजेचे आहे. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे आदेशही ठाकरे यांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन अभियान संचालक ह्रषिकेश यशोद उपस्थित होते.
या योजने अंतर्गत आतापर्यंत २० हजार पाणीपुरवठा योजनांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाले असून नऊ हजार कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर सहा हजार कामे सुरू आहेत. राज्यातील एक लाख ४६ हजार ग्रामीण कुटुंबांपैकी एक लाख कुटुंबांकडे वैयक्तिक नळ जोडणी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.