किनारा मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण

अविरतपणे सुरू असलेल्या कामामुळे मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाले आहे.

मुंबई : अविरतपणे सुरू असलेल्या कामामुळे मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाले आहे. तर दोनपैकी एका बोगद्याचे काम पूर्ण होत आले आहे. प्रकल्पस्थळी कामाने वेग घेतला. सुमारे १२ हजार ७२१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये आपल्या वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रिन्सेस स्ट्रीट येथील उड्डाणपुलापासून कांदिवलीपर्यंत मुंबई किनारा मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट येथील उड्डाणपुलापासून वरळी, वांद्रे सागरीसेतूपर्यंतचा किनारा मार्ग उभारण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली. त्यानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यातील १०.५८ कि.मी. लांबीच्या किनारा मार्गाचे काम तीन भागांत विभागून त्यासाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली. किनारा मार्ग प्रकल्पासाठी १११ हेक्टर भरावभूमी निर्माण करण्यात येणार असून यापैकी बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

सागरी किनारा मार्गावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी चार अशा एकूण आठ मार्गिका उभारण्यात येणार आहेत. किनाऱ्यालगत भरावभूमीच्या माध्यमातून ४.३५ कि.मी. लांबीच्या रस्त्याची बांधणी  करण्यात येत आहे, तर २.१९ कि.मी. लांबीचा पूलही उभारण्यात येणार आहे.

मरिन लाइन्स येथून प्रियदर्शनी पार्कपर्यंत जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी २.०७ किलोमीटर लांबीचे दोन बोगदा उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या उभारणीचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून २०२३ मध्ये लोकार्पण करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे प्रकल्पस्थळी कामाने वेग घेतला आहे.

एका बाजूला बोगद्यासाठी सुरू असलेले खोदकाम, तर दुसरीकडे भरावभूमीवर सुरू असलेले सपाटीकरण, क्रेनची संथगतीने सुरू असलेली हालचाल, पूल, पेटीका मलनिस्सारण वाहिन्यांच्या उभारणीत व्यस्त असलेले कामगार, कार्यस्थळी निरीक्षणासाठी अभियंत्यांची सुरू असलेली धावपळ, तर मध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधितांसोबत सुरू असलेले पाहणी दौरे.. हे चित्र मरिन ड्राइव्ह ते सागरीसेतू दरम्यानचे आहे. 

बोगद्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण

प्रियदर्शनी पार्क येथून मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याच्या खोदकामास ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत १,६१५ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. डिसेंबरमध्ये एका बोगद्याचे खोदकाम पूर्ण होईल. त्यानंतर मरिन ड्राइव्ह येथून प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात येणार आहे. मलबार हिल टेकडीखालून बोगदे जात आहेत. १२.१९ व्यासाचे हे बोगदे देशातील सर्वात मोठे बोगदे ठरणार आहेत.

विविध सुविधा

या प्रकल्पात ७.४७ कि.मी. लांबीची तटरक्षक भिंत उभारण्यात येणार असून मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये त्याची भर पडणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने ७० हेक्टर जागेवर हरितक्षेत्र निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये सायकल मार्गिका, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, बेस्ट बस आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका, हाजीअली आणि महालक्ष्मी मंदिराजवळून जाणाऱ्या या मार्गावर सार्वजनिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी एकूण १५.६६ कि.मी. लांबीचे तीन आंतरबदल मार्गही बांधण्यात येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Completion coastal road works ysh

ताज्या बातम्या