मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२४ अंतर्गतच्या तुकडीतील पदव्युत्तर विधि शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची (एटीकेटी) परीक्षा अद्यापही घेतली नसल्यामुळे द्वितीय वर्षातील प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. द्वितीय वर्षात प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी प्रथम वर्षातील ८ पैकी ६ विषयांत उत्तीर्ण असणे बंधनकारक असते. मात्र प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्यामुळे द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया ‘तात्पुरती’ झाली असून ‘अंतिम प्रवेश प्रक्रिया’ पूर्ण होणे बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदव्युत्तर विधि शाखेचा अभ्यासक्रम एकूण दोन वर्षांचा असतो. प्रथम वर्षाअंतर्गत प्रथम सत्रात ४ आणि द्वितीय सत्रात ४ असे एकूण ८ विषय हे प्रथम वर्षात असतात. करोनाकाळा पूर्वी प्रथम सत्र परीक्षा नोव्हेंबर आणि द्वितीय सत्र परीक्षा एप्रिलमध्ये व्हायची. द्वितीय सत्र परीक्षा झाल्यानंतर प्रथम सत्रात विविध विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा (एटीकेटी) देऊन संबंधित विषयांत उत्तीर्ण होण्याची संधी मिळत असे. त्यामुळे विद्यार्थी प्रथम वर्षातील ८ पैकी ६ विषयांत उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे पदव्युत्तर विधि शाखेची प्रथम सत्र परीक्षा जून २०२३ मध्ये घेण्यात आली आणि निकाल हा ७ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. तसेच द्वितीय सत्र परीक्षा ७ डिसेंबर २०२३ रोजी संपली. त्यानंतर लगेच प्रथम सत्राच्या पुनर्परीक्षार्थींची परीक्षा होणे अपेक्षित होते. मात्र प्रथम सत्रातील अनुत्तीर्ण विषयांमध्ये उत्तीर्ण होण्याची एक संधी अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. जर आता द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला, परंतु प्रथम सत्राच्या पुनर्परीक्षार्थींची परीक्षा घेतली नाही, तर संबंधित विद्यार्थ्यांचा द्वितीय वर्षात प्रवेश निश्चित होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

हेही वाचा – दहिसर- भाईंदर रस्त्याचा भार मुंबई पालिकेवर; ‘एमएमआरडीए’ची निधी देण्यास असमर्थता

‘मी शैक्षणिक वर्ष २०२२-२४ या तुकडीतील पदव्युत्तर विधी शाखेची विद्यार्थिनी आहे. प्रथम सत्र परीक्षेत मी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहे. जर मी द्वितीय सत्र परीक्षेत २ विषयांत अनुत्तीर्ण झाले, तर माझा द्वितीय वर्षात अंतिम प्रवेश निश्चित होणार नाही. परिणामी माझे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींची परीक्षा तात्काळ होऊन निकाल जाहीर होणे गरजेचे आहे. मुंबई विद्यापीठाचे परीक्षेचे वेळापत्रक कधीच निश्चित नसते, निकालही वेळेत जाहीर होत नाहीत. विद्यापीठाच्या विस्कळीत कामकाजामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो’, अशी खंत एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

निकाल, प्रवेश, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच

‘पदव्युत्तर विधि शाखा द्वितीय सत्र परीक्षेचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची द्वितीय वर्षाची ‘तात्पुरती’ स्वरूपातील प्रवेश प्रक्रिया ‘अंतिम’ स्वरूपात निश्चित होईल. तसेच प्रथम सत्राच्या पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षेचे वेळापत्रक व नियमित तृतीय सत्र परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करू’, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा – प्रगतीच्या वाटेवरील अग्रेसर जिल्ह्यांचा आज सन्मान

६९ दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेची द्वितीय सत्र परीक्षा २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेतली होती. परीक्षा जवळपास दोन महिने झाले तरीही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे द्वितीय वर्षात प्रवेश निश्चित कधी होणार? प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची परीक्षा होऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concern for law faculty examinees the mumbai university has forgotten the first semester re examination of post graduation mumbai print news ssb
First published on: 15-02-2024 at 14:00 IST