मुंबई: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना सवलतीचा बेस्ट बस पास दिला जातो. या सवलतीत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी नाहीत, त्यांनाही हा पास देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची थकित देणीही गणेशोत्सवाआधी ताबडतोब देण्याचे आदेशही शिंदे यांनी उपस्थित मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले.  उपक्रमाच्या अमृतमहोत्सवानिमित्त वीजेवरील नव्या वातानुकूलित दुमजली बस आणि प्रिमियम बसचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील एनसीपीए येथे करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रकल्प सहकार्याबद्दल बोलताना त्यांनी केंद्राच्या सर्व प्रकल्पांना राज्य सरकारकडून सहकार्य मिळेल. यामध्ये मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग जेएनपीटीशी तसेच नरीमन पॉईंटशी जोडण्याचा या प्रकल्पासाठीही जे सहकार्य लागेल, ते देण्याचे आश्वासनही त्यांनी नितीन गडकरी यांना दिले. रस्त्यांवरील खड्डयांविषयी बोलताना शिंदे यांनी ४२३ किलोमीटरच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असून मार्च २०२३ पर्यंत ते पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईतील १०० टक्के रस्ते कॉंक्रीट होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बेस्टची दुमजली आणि प्रिमियम बसचे लोकार्पण

यावेळी बेस्टच्या वातानुकूलित दुमजली बस आणि प्रिमियम वातानुकूलित बसचे उद्घाटन  करण्यात आले. या दोन्ही सेवा येत्या सप्टेंबरमध्ये उपलब्ध होतील. प्रिमियम बस सेवेत प्रवाशांना आसन मोबाईल अ‍ॅपद्वारे आगाऊ आरक्षित करता येणार आहे. या बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास बंदी असणार आहे. या सेवेत मासिक बस पासही उपलब्ध केला जाईल. याचे भाडे स्थिर असेल.

‘हवेवर, पाण्यावर चालणारी बस, वॉटर टॅक्सीचा पर्यायही निवडा’

लोकार्पण सोहळय़ाला उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना, बेस्ट उपक्रमाने जशी विजेवर चालणारी वातानुकूलित दुमजली बस सेवेत आणली, त्याप्रमाणे उपक्रमाने पाण्यावर आणि हवेवरही चालणारी दुमजली बसचाही विचार करावा. सध्या अशी बस फिलिपाईन्समध्ये आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या. तसेच वॉटर टॅक्सीचाही पर्याय गडकरी यांनी सुचविला. यामुळे वाहतुक कोंडीतून सुटका होतानाच प्रदूषणही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय लवकरच कर्णकर्कश होर्नमधून सुटका करण्यासाठी कायदा करणार असल्याचे सांगतानाच भारतीय संगीतातील वाद्यांचे जसे बासरी, तबला यासारखे हॉर्न आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. नरीमन पॉईट ते दिल्ली द्रुतगती महामार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचीही मदत लागणार असून ती मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. इंधनाबाबत बोलताना त्यांनी डिझेल बसचे रुपांतर हायड्रोजन बसमध्ये कसे करता येईल, याचा प्रस्ताव तयार असल्याचे ते म्हणाले. बेस्टच्या सर्व बस विजेवर रुपांतरीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून ७० टक्के अनुदानही देण्यात येईल, त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचेही बेस्ट उपक्रमाला गडकरी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concession pass best degree post graduate students mumbai municipal commissioner ysh
First published on: 19-08-2022 at 01:07 IST