पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना

मुंबई : करोना योद्ध्यांनी आतापर्यंत लोकांना लसीकरण केंद्रात आणण्याची आणि तेथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे त्यासाठी आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा बुधवारी आढावा घेतला. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी दूरचित्र संवादाद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी करोना योद्ध्यांशीही संवाद साधला. या वेळी देशात लसीकरण धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. 

लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरूक करणे गरजेचे आहे, करोना योद्ध्यांना त्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा लागेल. जनजागृतीसाठी स्थानिक धार्मिक नेत्यांचीही मदत घेता येईल. त्यांची दोन मिनिटांची चित्रफीत बनवून लोकांना संदेश देता येईल अशी सूचना पंतप्रधानांनी या वेळी केली.

करोना योद्ध्यांनी आतापर्यंत लोकांना लसीकरण केंद्रात नेण्याची आणि तेथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. आता प्रत्येक घरात लस, घरोघरी लसीकरण, या स्फूर्तीने प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ  लागतो तेव्हा लोक निष्काळजी होतात, त्यामुळे घरोघरी लसीकरणासाठी घराचा दरवाजा ठोठावताना पहिल्या मात्रेबरोबरच दुसऱ्या मात्रेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. देशात १०० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असल्या तरी आपण हलगर्जी केल्यास, नवे संकट येऊ  शकते, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.

करोना महासाथीच्या काळात देशाने समर्थपणे अनेक आव्हानांचा सामना केला आहे. ते करताना आपण नवीन उपाय शोधले आणि त्यांचा अवलंब केला, असे सांगून पंतप्रधानांनी  जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करावा लागेल, जास्तीचे काम करावे लागेल, असे सांगितले.

‘प्रत्येकाला लस, मोफत लस’ मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम केला आहे. यातूनच आपले सामथ्र्य दिसून येते, असेही पंतप्रधान म्हणाले.

राज्यात ३ कोटी ११ लाख जणांचे लसीकरण पूर्ण

राज्यात आतापर्यंत ६ कोटी ७३ लाख ९० हजार लोकांनी एक तर ३ कोटी ११लाख ४२ हजार लोकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. १ लाख ७५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. तसेच अत्यावश्यक सेवेतील तीन लाख कर्मचारी, ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ११ लाख ८९ हजार, १८ ते ४४ वयोगटातील दोन कोटी, २४ लाख लोकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. राज्यात १८ वर्षावरील लसीची किमान एक मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ७३.७० टक्के  असून १८-४४ वयोगटातील किमान एक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ६५.२३ टक्के  तर ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लसीची किमान एक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ७७.५० टक्के  असल्याची माहिती यावेळी राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांना देण्यात आली.

पंतप्रधानांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या औरंगाबाद, बुलढाणा आणि नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी का?

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे जिल्ह्यात लसीकरण कमी होण्याची कारणे तसेच लसीकरण वाढविण्यासाठी काय उपाययोजना आहेत याबाबत या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विचारणा के ली. तसेच राज्यातील लसीकरण वाढविण्यावर भर देण्याची सूचना सरकारला के ली.

 अतिवृष्टी तसेच काही विशिष्ट वर्गाकडून लसीकरणास मिळणारा कमी प्रतिसाद यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवचकुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा करोना विरुद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात असून या कार्यक्रमात विविध धर्मगुरूंना सहभागी करून घेतले जात आहे. तसेच लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी पंतप्रधांना दिली. औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे, असे आदेश मोदी यांनी दिले.