वैद्यकीय प्रवेश अधांतरीच

परीक्षा जूनऐवजी नोव्हेंबरमध्ये

आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, नर्सिगच्या ५० टक्के महाविद्यालयांच्या मान्यतेस विलंब

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया मार्गी लागली असली तरी वैद्यकीयच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, नर्सिग आदी विविध शाखांच्या तब्बल ५० टक्के महाविद्यालयांची मान्यता येण्यास विलंब झाल्याने त्याचा फटका या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना बसतो आहे. यात वरळी येथील पोदार महाविद्यालयाबरोबरच नांदेड, नागपूर, उस्मानाबाद येथील सरकारी महाविद्यालयांचाही समावेश आहे. महाविद्यालयांच्या मान्यतेचे प्रकरण केंद्रीय नियामक संस्थांकडून रखडल्याने ऑगस्ट संपत आला तरी या अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही.

यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुरुवातीपासूनच वैद्यकीयची प्रवेश प्रक्रिया बाधित झाली आहे. आतापर्यंत एमबीबीएस आणि बीडीएसची (सरकारी महाविद्यालयांसाठी) पहिलीच प्रवेश फेरी पार पडली आहे. तर दुसरीकडे आयुष व नर्सिग कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, युनानी, नर्सिगच्या तब्बल ५० टक्के महाविद्यालयांची मान्यताच आलेली नाही.

सरकारी व खासगी महाविद्यालयांना दरवर्षी प्रवेशापूर्वी मान्यता घ्यावी लागते. ही प्रक्रिया मे किंवा जुनपर्यंत होऊन सप्टेंबर अखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. यंदा मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विभागांत समन्वय नसल्याने मान्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नियामक संस्थांच्या मान्यतेशिवाय ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’ला (एमयूएचएस)संलग्नता देता येत नाही आणि संलग्नता मिळाल्याशिवाय महाविद्यालयांचे प्रवेश करता येत नाहीत. परंतु, महाराष्ट्रातील सुमारे २५० महाविद्यालयांपैकी केवळ ५० टक्के महाविद्यालयांनाच अद्याप मान्यता मिळू शकली आहे, अशी प्रतिक्रिया एमयूएचएसचे कुलसचिव कालिदास चौहान यांनी सांगितले. त्यामुळे, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला प्रवेश प्रक्रियाच सुरू करता आलेली नाही. अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांची २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांची मान्यता त्या त्या केंद्रीय नियामक संस्थांकडून अद्याप आलेली नाही. जोपर्यंत ही मान्यता येत नाही, तोपर्यंत प्रवेश करता येत नाहीत. त्याआधीच प्रवेश केल्यास आणि नंतर उर्वरित महाविद्यालयांना मान्यता आल्यास त्यामुळे झालेले प्रवेश बाधित होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

वैद्यकीयच्या प्रवेश प्रक्रियेवर इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून असतात. अभियांत्रिकीच्या प्रवेशाची प्रक्रिया संपण्याच्या मार्गावर आहे. औषधनिर्माणशास्त्राचे प्रवेशही शेवटच्या टप्प्यात आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या विज्ञान शाखेची पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया संपून महाविद्यालये सुरूही झाली आहेत. त्यामुळे, विद्यार्थी संभ्रमात आहेत.

परीक्षा जूनऐवजी नोव्हेंबरमध्ये

प्रवेश विलंबाने झाले तरी प्रत्येक शैक्षणिक वर्षांत २४० दिवस अध्यापन करावेच लागते. अभ्यासक्रम पूर्ण होण्याकरिता हे शैक्षणिक वेळापत्रक नेमून देण्यात आले आहे. दरवर्षी ३० सप्टेंबपर्यंत जे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये दाखल होतात त्यांची जून, २०१७ला परीक्षा घेतली जाते. त्यानंतर दाखल होणाऱ्यांची परीक्षा नोव्हेंबर, २०१७मध्ये होते. परंतु, यंदा प्रवेश प्रक्रिया इतकी लांबली आहे, की बहुतांश विद्यार्थ्यांना सहा महिने उशिरा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अभ्यासक्रम व महाविद्यालये

  • बीपीएमटी : २१
  • आयुर्वेद/युनानी : ६९
  • होमिओपॅथी : ४६
  • बीएस्सी-नर्सिग : ८३
  • पीबीएससी : ४०

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Confusion about medical college admission

ताज्या बातम्या