पालिकेकडून आराखडा; आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर आता मुंबईतील शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत आता पालिका प्रशासन चाचपणी करीत आहे. एकीकडे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिवाळीनंतर शाळा सुरू होतील अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर राज्य सरकारने घोषणा केल्यामुळे पालिका प्रशासन आराखडा तयार करण्याच्या मागे लागले आहे. ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यताही आरोग्य विभाग व्यक्त करीत आहे. त्यामुळे शाळा सुरू  करण्याबाबत गोंधळाचे वातावरण आहे.

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. तसेच महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत आयुक्तांच्या मंजुरीकरिता शिक्षण विभागातर्फे  सोमवारी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. आयुक्तांच्या मंजुरीनंतर आठवड्याभरात याबाबत नियमावली तयार करण्यात येईल. ही नियमावली मुंबईतील सर्व बोर्डाच्या, पालिकेच्या, खासगी शाळांना बंधनकारक राहील, असेही ते म्हणाले.

मुंबईमध्ये पालिकेच्या २४५ माध्यमिक शाळा असून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास या सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. विद्यार्थ्यांना मुखपट्ट्या, तापमान तपासण्याची सोय अशा सर्व

 करोना नियमांचे पालन केले जाणार आहे.

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची घोषणा केलेली असली तरी महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना दिला आहे. त्यानुसार सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. मुंबईतील शाळा सुरू होतीलच असे नाही. लोकांनी भयभीत व्हावे अशी परिस्थिती नसली तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊ.          – किशोरी पेडणेकर, महापौर

पालकांचे संमतीपत्र असेल तरच प्रत्यक्ष भरणाऱ्या शाळेत मुलांना प्रवेश दिला जाईल. तसेच ज्या मुलांचे पालक संमतीपत्र देत नसतील अशा मुलांचे शिक्षण दृक्श्राव्य माध्यमातून सुरूच ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत पालिके च्या शाळांतील ७३ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले  असून प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होईल याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.          – राजू तडवी, शिक्षणाधिकारी