मुंबई : मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचे दरवाजे न उघडल्याने बुधवारी सकाळी दादर स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला. परिणामी, अनेक प्रवाशांना दादर स्थानकात उतरता आले नाही. अखेर या प्रवाशांना भायखळा येथे उतरावे लागले. मध्य रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

बुधवारी सकाळी १०.४२ ची बदलापूर – सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकल दुपारी १२ च्या सुमारास दादर स्थानकात आली. मात्र लोकलचे स्वयंचलित दरवाजे न उघडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमारे ६.४ किमी दूर थांबा असलेल्या भायखळा स्थानकात प्रवाशांना उतरावे लागले. या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

बदलापूर – सीएसएमटी वातानुकूलित लोकल दादरला पोहोचली. लोकलमधील अनेक प्रवाशांना दादरला उतरायचे होते. पण लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना स्थानकात उतरता आले नाही. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी टाॅक-बॅक यंत्रणेवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही यंत्रणा काम करत नव्हती, अशी माहिती प्रवाशांनी दिली. तसेच काही प्रवासी आपत्कालीन साखळी ओढणार होते. परंतु, यामुळे इतर लोकलचा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी साखळी ओढली नाही. ही लोकल भायखळा स्थानकात थाबली. त्यानंतर प्रवासी लोकलमधून बाहेर पडले आणि त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला.