मुंबई : दहिसरमध्ये सुरू असलेल्या अग्निशमन दलातील अग्निशामकांच्या भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी महिला उमेदवारांनी गोंधळ घातला. महिला अग्निशामक पदासाठी १६२ इंच उंचीच्या निकषात बसत असतानाही अनेकांना डावलण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या उमेदवार मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. परिणामी, भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्या महिला उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. मात्र परिस्थिती चिघळल्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहिसर येथील भरती केंद्रामध्ये उशीरा पोहोचलेल्या उमेदवारांना टोकन देऊन दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आले. परंतु वेळेत आलेल्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. तर १६२ इंच उंचीचा निकषात असूनही जाणीवपूर्वक अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच कमी उंचीच्या मुलींना पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात येत होता. संतप्त उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी उपस्थित अधिकाऱ्यांबरोबर प्रचंड वाद घातला. वाद चिघळल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती चिघळू लागताच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाच्या स्थगित झालेल्या सर्व परीक्षा ६ फेब्रुवारीपासून

दहिसरमधील अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान शनिवारी महिला उमेदवारांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला होत्या. त्यांना बाहेरून कोणी तरी चिथावणी देत होते. अपात्र ठरवलेल्या उमेदवारांपैकी १० जणींना पोलीस बंदोबस्तात पुन्हा एकदा उंची तपासणीसाठी आत घेण्यात आले होते. या सर्वांची उंची १६० इंचापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्या महिला उमेदवारांमध्येच वाद झाला, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी सांगितले.

भरती प्रक्रिया केंद्रावर सकाळी ८.१५ वाजेपर्यंत आलेल्या प्रत्येकाला आत घेण्यात आले होते. मात्र उशीरा आलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनीच उंचीचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला. वेळेत न आलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला, तर उंचीच्या निकषात न बसणाऱ्या मुलींना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion during fire brigade recruitment process police women protestors mumbai print news ysh
First published on: 04-02-2023 at 22:55 IST