दिव्यात ओव्हरहेड वायर तुटली तर ठाण्यात सिग्नल यंत्रणेत बिघाड
गेल्या दोन आठवडय़ापासून सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेने आपली गोंधळाची परंपरा शनिवारीही कायम ठेवली. मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमधील विद्युतप्रवाह खंडित झाल्याने दुपारी एक ते दीड तास छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. त्यामुळे मध्य रेल्वेवरील गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मध्य रेल्वेवरील मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान दुपारी एकच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील विद्युतप्रवाह खंडित झाला. त्यामुळे अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी सात गाडय़ा जागीच खोळंबून राहिल्या. हा गोंधळ गर्दीच्या वेळेत झाला नसला तरी दुपारी दोनवाजेपर्यंत मुंब्रा, कळवा, ठाणे या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. यात उष्म्याने हैराण झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तर दुपारी २.१८ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने केला.
ओव्हरहेड वायरचा गोंधळ दूर करून दिव्यातून लोकलगाडय़ा ठाण्यापर्यंत पोहोचल्या, तर ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात आणखीनच भर पडली. ठाणे स्थानकातून एकाच फलाटावरून सगळ्या गाडय़ा सोडण्यात येत असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर गाडय़ांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्या होत्या. लोकल आणि मेलगाडय़ांच्या खोळंब्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
उन्हाच्या झळा आणि गाडय़ांमधील बंद पडलेले पंखे यामुळे प्रवासी उन्हाच्या झळांनी हवालदिल झाले होते. सुमारे एक तासाच्या प्रदीर्घ खोळंब्यानंतर अखेर लोकलगाडय़ा पुढे सरकल्या, मात्र ठाणे स्थानकातही सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने काही फलाटांवरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती. चार नंबर फलाटावरील सर्व गाडय़ा सहा नंबरवरून वळविण्यात येत होत्या. त्यामुळे ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी उसळली होती. ठाण्याबरोबरच कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांसह डोंबिवली आणि कल्याण स्थानकांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढली होती. त्यातच वाढलेल्या उन्हाचे चटके प्रवाशांना सहन करावे लागत होते. महिला आणि लहान मुलांना या गोंधळाचा मोठा फटका सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रत्येक रविवारी देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतले जातात, मात्र तरीही ओव्हरहेड वायर तुटणे आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाड नित्यनियमाने होतात. त्यामुळे मेगाब्लॉमध्ये नेमके प्रशासन कोणते काम करते, असा सवाल अनेक प्रवाशांनी उपस्थित केला.
मध्य रेल्वेवरील सर्व ओव्हरहेड वायर कालबाह्य़ झालेल्या आहेत. तसेच सिग्नल यंत्रणाही बदलण्याची गरज आहे. या आधी आम्ही आंदोलन केले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका अधिकाऱ्याची नेमणूक करून समिती स्थापन केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. शिवाय अनेक रेल्वे स्थानकांत पूलही कमी असल्याने चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे. परिस्थिती आटोक्यात आली नाही तर पुन्हा आंदोलन छेडावे लागेल.
– नंदकुमार देशमुख,
प्रवासी संघटना अध्यक्ष.