तिकीटावरची दरमर्यादा हटवल्याचा ‘जीआर’ लवकर काढण्याचे चित्रपट निर्मात्यांचे आवाहन

राज्यात मराठी चित्रपट करमुक्त असल्याने तिकीटांचे दर शंभर ते दोनशे रुपयांच्या घरात होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवीन वस्तू व सेवा कर लागू होत असल्याने मराठी चित्रपटांच्या तिकीटांवरही १८ टक्के कर आकारणी होणार आहे. या नव्या कर आकारणीनुसार मराठी चित्रपटांच्या तिकिटांचे दर निश्चित झाले नसल्याने शनिवारच्या मराठी चित्रपटांच्या शोबद्दल एकूणच चित्रपटगृह मालक आणि ‘बुक माय शो’सारखी संकेतस्थळे यांचा पुरता गोंधळ उडाला. हा गोंधळ कमी व्हावा यासाठी नव्या वस्तू व सेवा करामुळे मराठी चित्रपटांच्या तिकीट दरांवरील मर्यादा हटवल्याचा ‘जीआर’ सरकारने लवकरात लवकर काढावा, असे आवाहन मराठी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यभरात मराठी चित्रपट करमुक्त असल्याने एकपडदा चित्रपटगृहांना शंभर रुपयांच्या वर तर मल्टिप्लेक्सना दोनशे रुपयांच्या वर तिकीटांचे दर वाढवता येत नव्हते. करमणूक कर नसल्याने राज्यभरातील चित्रपटगृहांमधून तिकीटांच्या दरावर ही मर्यादा असल्याचा जीआर राज्य सरकारने २२ फेब्रुवारी २०१३ ला काढला होता. मात्र नव्या वस्तू व सेवा करानुसार शंभर रुपयाच्या तिकीटावरही १८ टक्के कर लागणार असल्याने तिकीटाच्या दरांवरची आधीची मर्यादा काढून टाकणे गरजेचे आहे. नाहीतर चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होईल, याकडे लक्ष वेधत तसा नवा जीआर काढणे गरजेचे असल्याची माहिती मराठी चित्रपट निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना दिली होती.

‘रिंगण’ आणि ‘अंडय़ाचा फंडा’ असे दोन मराठी चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. तर  ‘चि. व चि. सौ. कां.’ हा चित्रपट सातव्या आठवडय़ातही सुरू आहे. त्यामुळे वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतरच्या गोंधळाचा फटका या मराठी चित्रपटांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

यासंदर्भातील लेखी निवेदनही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी  सरकारकडे दिले आहे. मात्र अजूनही तसा ‘जीआर’ निघालेला नसल्याने चित्रपटगृह मालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मराठी चित्रपटांच्या तिकीटांचे दर निश्चित नसल्याने ‘बुक माय शो’सारख्या चित्रपटांचे ऑनलाईन आरक्षण सेवा देणाऱ्या संकेतस्थळांनी चित्रपटांच्या शोजची माहिती कमी केली होती. सध्या ऑनलाईन बुकिंग करण्याकडे लोकांचा कल जास्त असल्याने या गोंधळाचा परिणाम मराठी चित्रपटांच्या शनिवार-रविवारच्या व्यवसायावर होईल, अशी भीती निर्मात्यांना वाटते आहे.