प्रमाणपत्र देण्यास आणि प्रत्यक्ष उपस्थितीसही डॉक्टरांचा नकार

मुंबई : अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी आरोग्यदृष्टय़ा पात्र असल्याचे प्रमाणपत्र आणि लसीकरणाच्या वेळेस प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर तयार होत नसल्यामुळे या दोन्ही अटींची पूर्तता कशी करायची असा प्रश्न नातेवाईकांपुढे निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीमध्ये अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती लस घेण्यास आरोग्यदृष्टय़ा पात्र असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडून लस दिल्यानंतर पुढील अर्ध्या तासात काही दुष्परिणाम होत नाहीत ना याबाबत देखरेख करण्यासाठी या व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्यांच्या डॉक्टरांना घरी बोलविणे आवश्यक आहे.

के-पूर्व विभागात नोंदणी केलेल्या २०९ नागरिकांना पूर्वतयारीसाठी फोन केले असता घरी येऊन लसीकरण होईपर्यंत थांबण्यास डॉक्टर तयार नसल्याचे सांगितले. तर काही जणांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. या अटी पूर्ण केल्याशिवाय आम्हीही लसीकरण करू शकत नाही. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी यांनी व्यक्त केले.

डॉक्टरांना लस घेण्याच्या वेळेस प्रत्यक्ष थांबणे गैरसोईचे आहे. लसीकरणासाठी येणारी टीम दिलेल्या वेळेतच येईल असे नाही. त्यामुळे त्याआधी काही काळ आणि लस दिल्यानंतर अर्धा तास असे एवढा वेळ दवाखाना सोडून थांबणे शक्य नाही. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) डॉ. पृथ्वी सिंग यांनी व्यक्त केले.

मुळात ही लस नवीन आहे. त्यात अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीं आधीच आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नसते. अशा व्यक्ती लस देण्यास पात्र आहेत असे प्रमाणपत्र डॉक्टर कसे  देणार. त्या व्यक्तीला पुढे काही दुष्परिणाम झाल्यास याची जबाबदारी डॉक्टर कशी घेणार असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

नियमावलीबाबत स्पष्टता आवश्यक

अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींना कोणता आजार आहे याची डॉक्टरांना माहिती घ्यावी लागेल. तसेच हे लसीकरणासाठी पात्र आहेत का यासाठी रुग्णाच्या मधुमेह, रक्तदाब इतर तपासण्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे सर्व करून प्रमाणपत्र कसे द्यावे, यात काय नमूद करणे अपेक्षित आहे, लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास जबाबदारी कोणाची असेल याबाबत अनेक संभ्रम आहेत. याबाबत अधिक स्पष्टता येणे गरजेचे आहे, असे आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.