scorecardresearch

महागाईविरोधात काँग्रेसचे ३१ मार्चपासून आंदोलन ; नाना पटोले यांची घोषणा

मागील पाच दिवसांत पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख इम्रान प्रजापती यांनी मुंबईत पक्षाच्या प्रदेश अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक रविवारी घेतली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे स्वागत केले.

मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात व झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन आठवडाभर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केले.

नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’  असा भाजपचा कारभार आहे.

निवडून आल्यावर लगेच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलेंडर १००० ते ११०० रुपये एवढय़ा किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून १ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही खेद वाटत नाही.

संघटित व असंघटित कामगारांच्या समस्या व मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे, या संपाला काँग्रेसने पािठबा दिला आहे, असे पटोले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress agitation against inflation from march 31 nana patole zws

ताज्या बातम्या