मुंबई : जातीव्यवस्थेत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) खालचे स्थान देऊन मनुवाद्यांनी त्यांचा गैरवापर केला. त्यात बदल करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह राहुल गांधी यांनी धरला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केले.

परळ येथील प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे रविवारी ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व ‘मंडल विरुद्ध मनूवाद’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राज्य प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, खासदार प्रतिभा धानोरकर, प्रवक्ते हनुमंत पवार उपस्थित होते.

राज्यात आरक्षणासाठी विविध समाजांची आंदोलने सुरू आहेत. आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणे व जातनिहाय जनगणना करणे हा त्यावर उपाय आहे. पण भाजप सरकार ते करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडा व राज्य करा ही ब्रिटिशांची नीती वापरून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली आहेत. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण फडणवीस सरकारने सुरू ठेवले असते तर आज ही वेळ आली नसती, असा दावा सपकाळ यांनी केला.

ओबीसी समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहिला, पण या समाजाला काही मिळाले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी पहिला आवाज उठवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व नोकऱ्यांसाठी होते, पण मंडल आयोगाच्या आंदोलनात शिरकाव करून मनुवाद्यांनी समाजात गैरसमज पसरवले, असा आरोप विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

ओबीसी समाज फक्त मतदान करणारा नाही तर नेतृत्व करणारा बनला पाहिजे. त्यासाठी ‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’, हा संकल्प केला पाहिजे, असे पुस्तकाचे लेखक प्रा. यशपाल भिंगे म्हणाले. ‘मंडल विरुद्ध मनूवाद’ हे पुस्तक कार्यकर्त्यांना जातीचे राजकारण कळावे, यासाठी लिहिल्याचे प्रा. भिंगे यांनी स्पष्ट केले.