मुंबई: भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदानचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी फेरतपासणीच्या माध्यमातून राज्यातही निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा व नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरपोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची ज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात व नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह प्रमुख नेते खासदार, आमदार व बुथ स्तरीय कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदार यादीतील कथित गैरप्रकार, मतदानचोरी आणि एसआयआर संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अभिनंदनाचा तसेच केरळचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एसआयआर मोहिमेबाबत सुरु केलेल्या मोहिमेच्या लोगोचे सर्व प्रमुख्य नेत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीविषयीच माहिती सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने एसआयआर मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेशी समन्वय साधून मतदार यादी पडताळणी मोहिमेला गती देण्याचे काम समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
