Congress Vanchit Bahujan Alliance : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने राजकारणात घडामोडी सुरू आहेत. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर आता मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढवणार असल्याचंही या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबईत आघाडीची घोषणा करत असताना मला आनंद होत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची नैसर्गिक मैत्री आहे. कारण संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडवणं हा आमचा देखील राजकीय अजेंडा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा देखील हाच राजकीय अजेंडा आहे.काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं नातं चांगलं आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं आम्ही सांगत होतो. आज आम्ही मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करत आहोत. तसेच राज्यात इतर २८ ठिकाणी युती करण्यासाठी देखील आमची चर्चा सुरू आहे. सकारात्मक निर्णय होईल. नगरपंचायतीच्या निवडणुकीत देखील काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो आहोत. आता आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष मित्र पक्ष म्हणून राहतील”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
“आजपासून आम्ही एका नव्या अध्यायाला सुरूवात करत आहोत. आमची आघाडी ही सत्तेसाठी नाही तर विचारांची आहे. भारतातील पुरोगामी विचार आणि संविधानाची मूल्ये जपण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत. आगामी काळात आमची आघाडी परिवर्तन घडवेल”, असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
कोण किती जागा लढवणार?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतींच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढवणार असल्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
