मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेसमधील देवरा आणि कामत गटामध्ये वाद उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी ज्ञानराज निकम यांना हटवून विरोधी पक्षनेतेपदी कामत समर्थक देवेंद्र उर्फ बाळा आंबेकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उभय गटांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सभागृहात आंबेकर यांच्या नावाची घोषणा होऊ नये यासाठी निकम समर्थकांनी कॅम्पा कोलावरून झालेला गदारोळ टिपेला नेला आणि अखेर सभागृह तहकूब झाले.
पालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने सुरेश कोपरकर यांच्या नावावर फुली मारून ज्ञानराज निकम यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातली. परंतु मौनीबाबा बनलेल्या निकम यांनी एकाही मुद्दय़ावर आवाज न उठविल्यामुळे काँग्रेसची धार बोधट बनली होती. त्यामुळे चांदुरकर यांनी पालिकेत निरीक्षक म्हणून राजहंस सिंह आणि मनहास सिंह यांना पाठविले. या द्वयींनी नगरसेवकांची कामगिरी व बैठकांमधील हजेरीचा ताळेबंद घेतला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला़
राजहंस सिंह, मनहास सिंह यांनी महापौर सुनील प्रभू यांची मंगळवारी भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदी आंबेकर यांची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र सादर केले. सभागृहात मंगळवारीच आंबेकर यांच्या नावाची घोषणा करण्याचा महापौरांचा इरादा होता. परंतु सभा तहकुबीमुळे देवरा समर्थक कामत गटाला काटशह देण्यात यशस्वी ठरले. आता आंबेकरांच्या नावाची घोषणा २८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

पालिकेत कॅम्पा ‘कोलाहल’
रहिवाशांना बेघर करण्याऐवजी विकासकावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे दिलीप पटेल यांनी मंगळवारी पालिका सभागृहात केली. मात्र त्याच वेळी काँग्रेसने आक्षेप घेत भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे महापौर सुनील प्रभू यांनी सभागृहाचे कामकाच पाच मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र सभागृह सुरू होताच पुन्हा भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये जुंपली. भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांच्या विरोधात घोषणा देताच काँग्रेस नगरसेवकही आक्रमक झाले. सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ सुरू झाला. अखेर कॅम्पा कोलातील रहिवाशांचा बेघर करण्यापेक्षा त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे सांगत सुनील प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.