मुंबई : निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये गडबडी करत भारतीय जनता पक्ष चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवत असून त्याला पायबंद घालण्याचे उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समिती गठीत केल्याचे माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
सात सदस्यांच्या या समितीत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, धनंजय चौधरी, परिक्षित जगताप हे सदस्य असून अभय छाजेड समन्वयक आहेत. समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत.
राज्यात नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील गैरप्रकाराबाबत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आयोगाने अद्याप त्यावर समाधानकारक खुलासा केलेला नाही. मतदार याद्यांमध्ये होणारे कथित घोटाळे रोखण्यासाठीच्या उपायांसदंर्भात ही समिती अहवाल सादर करणार आहे.