मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजेंद्र गवई यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा रासप तसेच शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे. या संघटना आणि पक्षांशी आमची आघाडी होईल. आमचा लढा भाजपशी असेल. त्यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षाशी काँग्रेस पक्ष आघाडी करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जिल्हाध्यक्ष, निरीक्षकांच्या आजच्या बैठकीत अर्जदारांची संख्या किती, किती जणांची मागणी आहे, जिल्हा समितीच्या शिफारशी काय आहेत, याअनुषंगाने आढावा घेण्यात आला. आतापर्यंत १५ जिल्ह्यांचा आढावा घेतला. अर्जांची संख्या मोठी असल्याने गुरुवारी दुपारपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
उद्या तिकीटवाटप पूर्ण करणार
काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढत आहोत. तर कुठे आघाडी केली जाणार आहे. तिकिटवाटपाची प्रक्रिया उद्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील उमेदवारांबाबत चर्चा झाली आहे. उमेदवारी अंतिम झालेल्या उमेदवारांना गुरुवारी एबी फॉर्म देण्यात येतील, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
ऑनलाईनऐवजी ऑफलाईन उमेदवारी अर्ज घ्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईनऐवजी केवळ ऑफलाईन करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ आणि अर्ज भरताना काटेकोरपणा हे षडयंत्र आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
विधानसभा आणि लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज लहान असतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज २५ पानांचा आहे. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक होत आहे. तो भरून ऑनलाईन अपलोड केल्यानंतर तो नंतर ऑफलाईनही सादर करावा लागतो. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाईन करा, अशी मागणी काँग्रेसने विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्या सहीने आयोगाला दिलेल्या पत्रात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. हा उमेदवारी अर्ज २५ पानांचा आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अनेक भागात इंटरनेट, सर्व्हर डाऊनच्या अडचणी येतात. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला ज्यापद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया असते, तशीच सोपी पद्धत असावी. उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्याचीही मुभा द्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
