मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी सोबत लढवली. या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागांवर विजय मिळवता आला. भाजप महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीत मुंबईत काँग्रेसची डाळ शिजली नाही. पक्षाच्या या निराशाजनक कामगिरीचे खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडत त्यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी भाई जगताप यांनी केली आहे.
निवडणूक निकाल येण्यास २४ तास उलटण्याआधीच भाई जगताप जाहीरपणे गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी करून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात आपण लेखी खुलासा करावा. विहित मुदतीत आपला समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे सचिव आणि मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे – हर्षवर्धन सपकाळ
मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्रि अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले. हुकमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला.
