मुंबईः काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईविरोधात शनिवारी दुपारी ३ वाजता मुंबई युवक काँग्रेसने मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाला टाळे लावले.
याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने यादव यांना १ दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली असून इतर १० कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे.
भाजप सरकारविरोधात उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर ईडीमार्फत कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात आंदोलन पुकारले हाेते. मुंबईमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. ईडीच्या कार्यालयाला शनिवारी सुटी होती. त्यामुळे कार्यालयात कोणीच नव्हते. तसेच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. मात्र काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याने ईडी कार्यालयाबाहेर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वाराला साखळीने अतिरिक्त टाळे लावले हाेते.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही ईडीच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी यादवला अंधेरी येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक बेकायदा – बचाव पक्षही
अटक बेकायदा आहे. याप्रकरणी पोलिसांनी मालमत्तेत घुसखोरी केल्याचे कलम लावले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे, असा युक्तीवाद आमच्याकडून न्यायालयात करण्यात आला. पण न्यायालयाने यादव यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील रवी जाधव यांनी दिली. कट रचून तसेच चुकिच्या प्रक्रियेद्वारे अटक करण्यात आली आहे. त्याबाबत सोमवारी यादव यांना न्यायालयापुढे हजर केल्यानंतर या सर्व बाबी आम्ही न्यायालयापुढे मांडणार आहोत. तसेच ज्या कायदेशिर प्रक्रियेची आवश्यकता आहे, ती आम्ही करू, असे जाधव यांनी स्पष्ट केले. दहा कार्यकर्त्यांचा शोध सुरूईडीच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत. त्यानुसार यादव यांच्यासह आणखी १० कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.