मुंबई: भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झाली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची आक्षेपार्ह चित्रफित समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदांवरून मुक्त करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
एका जबाबदार लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांने अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन करणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, मंत्री नहरही झिरवाळ यांनी या अपेक्षांचा भंग केला आहे.
झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दिवसाढवळ्या लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक होते. त्यामुळे नरहरी झिरवळ यांनी साधेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये. भोळ्या चेहऱ्यामागे खूपकाही दडलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणताही विलंब न करता झिरवाळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, असे सपकाळ म्हणाले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात डझनभर मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहेच पण सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच घनिष्ट संबंध असावेत हे अत्यंत लांछनास्पद आहे, चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद अद्याप कायम आहे. चाकणकर यांच्यानंतर नरहरी झिरवाळांचा प्रताप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदावरून मुक्त करावे, असेही सपकाळ म्हणाले.
