पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्गे जोडणाऱ्या अटल सेतूचे उदघाटन केले होते. मात्र अवघ्या काही महिन्यात अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज थेट अटल सेतूवर जाऊन या रस्त्याची दुरवस्था दाखवून दिली. रस्त्याला लांबच लांब भेगा पडलेल्या दिसत असून या भेगा हातभर खोल असल्याचेही नाना पटोले यांनी दाखवून दिले.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, बँकांकडून मोठी कर्ज काढून सरकार रस्तेबांधणी करते. जनतेची संपत्ती गहाण ठेवून कर्ज काढली जातात. मात्र लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्ग तर लोकांना मरण्यासाठीच तयार केला असल्याचा आरोप आम्ही वारंवार करत आलो होतो. आज अटल सेतू मार्गावरील दुरवस्था दाखवून देत आहोत.

काँग्रेसकडून आज आम्ही राज्यभर महायुतीवर चिखलफेक करत आहोत. त्याप्रमाणेच जनतेनेही या भ्रष्टाचारी सरकारवर आज चिखलफेक केली पाहीजे. भ्रष्टाचार हाच एकमेव अजेंडा या सरकारचा दिसतो, अशीही टीका नाना पटोले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या रस्त्याला दिले होते. वाजपेयी हे देशातील उत्तुंग नेत्यांपैकी एक होते. त्यांच्याही नावाचा अवमान यामुळे झाला असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पुराव्यानिशी हल्लाबोल करणार आहोत, असेही सुतोवाच नाना पटोले यांनी केले. कर्नाटकमधील भाजपा सरकार हे ४० टक्के कमिशन घेत होते. मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकार हे १०० टक्के कमिशन खाते, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

कसा आहे अटल सेतू?

२०१८ पासून या १८००० कोटी रुपयांच्या सेतूच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. नियोजनानुसार हे काम ४.५ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र करोना महामारीमुळे प्रकल्प आठ महिन्यांनी लांबणीवर पडला होता. शिवडीला मुख्य भूभागावरील न्हावा-शेवाशी जोडणारा २२ किमी लांबीचा सहा-लेन पूल, १६.५ किमी लांबीचा समुद्रमार्ग आणि जमिनीवरील ५.५ किमी मार्गांचा अटल सेतूमध्ये समावेश आहे.

या सेतूच्या बांधकामासाठी १७७,९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५०४,२५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे. सध्या, नवी मुंबईला जाण्यासाठी दोन प्रवेश पॉईंट्सआहेत- एक ऐरोली-मुलुंड कनेक्टर आणि दुसरा वाशी कनेक्टर. जर कोणी अलिबाग किंवा माथेरान किंवा लोणावळ्याला जात असेल तर ते अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी असलेल्या या कनेक्टर मार्गे जातात. MTHL मुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी होऊन रायगड जिल्ह्यासह आर्थिक एकीकरण होण्यासाठी मदत होईल, असे सांगितले जाते.