नारायण राणे ‘हाता’त ‘कमळ’ धरणार?

राणेंच्या दिल्लीवारीमुळे पुन्हा चर्चेला उधाण

Narayan Rane
नारायण राणे ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील नारायण राणे हे प्रत्येक पक्षाला हवे असणारे व्यक्मित्त्व असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यामुळे राणे कमळ हाती घेणार का, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘माझ्या पक्षांतराच्या बातम्या काँग्रेसचे नेत्यांकडूनच पेरल्या जात आहेत, असा आरोप मागील आठवडयातच राणे यांनी केला होता. त्यावेळी नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर प्रहार केला होता. यासोबतच कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही राणे यांनी सांगितले होते. मात्र ‘भूकंप सांगून येत नाही, तो अचानक होतो’, अशी सूचक प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली होती.
सोमवारी रात्री राणे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. सध्या शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास भाजपची नेतेमंडळी इच्छुक असल्याचे समजते. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास कोकणात भाजपची ताकद वाढणार आहे. मात्र राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress leader narayan rane meets bjp leaders in delhi

ताज्या बातम्या