scorecardresearch

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात नसिम खान यांची याचिका ; काँग्रेस, शिवसेनेत नव्या वादाची चिन्हे

आचारसंहितेच्या भंगाची तक्रार नसिम खान यांनी केली. या मुद्दय़ावर त्यांनी लांडे यांच्या निवडीला आव्हान दिले होते.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करणारी याचिका काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसिम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

न्यायालयाने त्यावर शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना नोटीस बजावली असून त्यांना सहा आठवडय़ांत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व काँग्रेस यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना असा  थेट सामना झाला होता. मुंबईतील चांदिवली मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे व काँग्रेसचे उमेदवार नसिम खान यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी  ४०९ मतांनी खान पराभूत झाले व लांडे विजयी झाले होते. मात्र प्रचाराची मुदत संपल्यानंतरही लांडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी आणि परिवहनमंत्री अनिल परब आणि चित्रपट अभिनेते मिलिद गुणाजी यांनी सभा घेतली असा आरोप करत आचारसंहितेच्या भंगाची तक्रार नसिम खान यांनी केली. या मुद्दय़ावर त्यांनी लांडे यांच्या निवडीला आव्हान दिले होते. या संदर्भात नसिम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आचारसंहितेचा भंग केल्यासंबंधी खान यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात सहा आठवडय़ांत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.  राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये विधनसभेच्या निवडणुका झाल्या. २१ ऑक्टोबरला मतदान होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ४८ तास आधी प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. तरीही लांडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २० ऑक्टोबरला प्रचार केला, त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे खान यांनी याचिकेत नमूद केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader naseem khan files petition against cm uddhav thackeray zws

ताज्या बातम्या