प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दुजोरा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्या आधारावर राष्ट्रवादीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याला दुजोरा दिला.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले होते. केवळ एक आमदार जास्त असल्याने त्यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याला पाठिंबा दिला. विधान परिषदेत मात्र राष्ट्रवादीकडे जास्त जागा असल्याने त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतपद राहिले.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४ , तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा दावा राहणार आहे. काँग्रेसनेही ते मान्य केले असून, त्यासाठी राष्ट्रवादीला पूर्ण सहकार्य करण्याची पक्षाची भूमिका आहे, असे थोरात यांनी दादर येथे टिळक भवनात पत्रकारांना सांगितले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी आधीच विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या सदस्याचीच त्यांच्या जागी निवड केली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावे, असे प्रयत्न सुरू आहेत.

संख्याबळ : विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एका सदस्याचा फरक आहे. काँग्रेसचे १३ आणि राष्ट्रवादीचे १४ सदस्य आहेत. काँग्रेस पुरस्कृत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे हेही आमजार आहेत आणि लोकभारतीचे कपिल पाटील यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या आधारावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्याला दुजोरा दिला.