मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दालनात गुरुवारी खासदार वर्षा गायकवाड यांनी ठिय्या दिला. धारावीतील सेक्टर ५ मध्ये म्हाडाच्या माध्यमातून काही इमारती बांधण्यात आल्या असून या इमारतीमधील घरे तयार असताना पात्र रहिवाशांना त्यांचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करीत गायकवाड यांनी श्रीनिवास यांच्या दालनात धारावीकरांसह आंदोलन केले. हे आंदोलन अद्यापही सुरू असून जोपर्यंत श्रीनिवास यांची भेट होत नाही तोपर्यंत दालनातून जाणार नाही, अशी ठाम भूमिका गायकवाड यांनी घेतली आहे.
यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीचा पुनर्विकास सेक्टर ५ मध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सेक्टर-५ च्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे देण्यात आली होती. त्यानुसार मंडळाने सेक्टर-५ मध्ये पाच इमारतींचे काम हाती घेतले. यातील एक इमारत पूर्ण करून ३५८ घरांचा ताबा पात्र धारावीकरांना दिला. तर चार इमारतींचे काम सुरू असतानाच राज्य सरकारने सेक्टर ५ प्रमाणे पुनर्विकास करण्याचा निर्णय रद्द करून एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे सेक्टर-५ चा पुनर्विकास मुंबई मंडळाकडून काढून घेण्यात आला. त्यानंतर एकत्रित पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबववून निविदा अंतिम करून अखेर धारावी पुनर्विकासाचे काम अदानी समुहाला दिले.
दरम्यान, मुंबई मंडळाने सेक्टर-५ प्रकल्प काढून घेण्यात आला असला तरी चार इमारतींचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने मुंबई मंडळाकडेच ठेवली. त्यानुसार मुंबई मंडळाने चार इमारतींचे काम पूर्ण केो आहे. मात्र या इमारतींचा ताबा अद्यापही डीआरपीकडे देण्यात आलेला नाही. डीआरपीकडून इमारतींचा ताबा मागण्यात येत आहे. मात्र मुंबई मंडळाने या इमारतींच्या बांधकामासाठी आलेला खर्च देण्याची मागणी डीआरपीकडे केली आहे. बांधकाम खर्चाची रक्कम मिळाल्यानंतरच इमारती डीआरपीकडे वर्ग करण्यात येतील, अशी ठाम भूमिका मुंबई मंडळाने घेतली आहे.
म्हाडाचे मुंबई मंडळ आणि डीआरपीमध्ये खर्चाच्या रक्कमेवरुन वाद सुरू असताना चार इमारतीतील घरांचा ताबा मात्र रखडला आहे. या इमारतीतील घरांसाठी शताब्दीनगरमधील रहिवाशी पात्र ठरले आहेत. त्यांना या घरांचा ताबा दिला जाणार आहे. मात्र ताबा मिळत नसल्याने शताब्दीनगरमधील रहिवासी नाराज आहेत. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वर्षा गायकवाड यांनी मोर्चा काढून म्हाडा भवनातील डीआरपीच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी श्रीनिवास कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे गायकवाड यांनी श्रीनिवास यांच्या दालनातच ठिय्या मांडला. जोपर्यंत श्रीनिवास यांची भेट होत नाही आणि घरांचा ताबा देण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे.