अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातलं सत्तानाट्य आता संपलं असून नवीन सरकार स्थापन झालं आहे. मात्र, एकीकडे शिंदे गट आणि भाजपावर अजूनही आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीची टांगती तलवार असताना दुसरीकडे सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडते की काय? असं चित्र आता निर्माण झालं आहे. याला कारणीभूत ठरलंय ते काँग्रेसचे मुंबईतील नेते मिलिंद देवरा यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेलं तक्रारीचं पत्र! या पत्रामध्ये काँग्रेसकडून शिंदे आणि फडणवीसांकडे शिवसेनेची तक्रार करण्यात आली असून शिवसेनेच्या अनैतिक कृतीवर तातडीने पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
महानगर पालिका निवडणुकीत पुन्हा सत्तानाट्य रंगणार?
मुंबईत लवकरच महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. करोना काळ आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका याआधीही प्रलंबित राहिल्या होत्या. मात्र, जसजशी निवडणुकीची शक्यता वाढू लागली आहे, तसतसा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला आहे. नुकतंच मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून त्यात शिवसेनेवर टीका केली आहे. या पत्रावर लागलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देऊन योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन देखील देऊन टाकलं आहे!




वॉर्ड पुनर्रचनेवरून शिवसेनेवर टीकास्त्र
मिलिंद देवरा यांनी मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेबाबत शिवसेनेवर गंभीर आक्षेप घेणारं पत्र पाठवलं आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. मात्र, त्याचा फायदा फक्त एकाच पक्षाला होईल, असं लक्षात आलं आहे. २०१७ साली काँग्रेसनं जिंकलेल्या ३० जागांपैकी २० प्रभागांची पुनर्रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रभागाची पुनर्रचना अशाच पद्धतीने करण्यात आली. हा प्रकार लोकशाहीच्या प्रतिमेला तडा देणारा आहे”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
“मुंबई महानगर पालिकेतील प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण धोरण त्वरीत रद्दबातल करावे आणि पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्यासाठी स्वतंत्र समितीची नेमणूक करावी”, अशी विनंती या पत्रात मिलिंद देवरांनी केली आहे.
दरम्यान, न्यूज १८ लोकमतशी बोलताना मिलिंद देवरांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन टीकास्त्र सोडलं आहे. “मुंबई महानगर पालिका भारतातली सर्वात श्रीमंत महानगर पालिका आहे. मुंबई निवडणुका मुक्तपणे पार पडायला हव्यात. फक्त एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईतल्या सर्व वॉर्डमध्ये फेरफार करणं अनैतिक आणि घटनाविरोधी आहे. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्र लिहिलं. काँग्रेसला किंवा अजून कुणाला संपवण्यासाठी असेल, पण शिवसेनेने वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे”, असा आरोप मिलिंद देवरांनी केला आहे.