मुंबई : अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याधर्तीवर महाराष्ट्रातील जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी त्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पत्र पाठवले आहे.

राज्यात झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणीयोग्य कागदी परिनिरिक्षण चिन्ह) प्रणालीचा वापर करण्यात आला नाही. मताची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकार हिरावला गेला. त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. याचा आयोगाने गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. आयोगाच्या चुकीच्या नियोजनामुळे यावेळी पालिका निवडणुकीत मतदान कमी टक्के झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाडला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग, महाराष्ट्रातच ईव्हीएमचा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात असल्याचे पटोले यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ. या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकशाहीच्या कणा आहेत. जनभावनेचा विचार करून राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यायला हरकत नाही. तसे झाल्यास लोकशाहीवरील मतदारांचा विश्वास वाढेल, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

अविश्वास वाढला

एकुण २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनी ईव्हीएम बाबतचा अविश्वास आणखी वाढला आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकांची मागणी होत आहे. डोंबिवली, छत्रपती संभाजी नगर येथे मतमोजणी करताना ईव्हीएम बंद पडल्याच्या आणि त्या बदली केल्याच्या तक्रारी विरोधी गटातील उमेदवारांनी केल्या आहेत.