जोरदार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे यावरून राजकीय कुरघोड्या करण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईमध्ये कुठेच पाणी तुंबले नसल्याचा ‘अजब’ दावा केला आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसनेही ट्विटरवरून शहर व्यवस्थापनासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. आता या शाब्दिक युद्धात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सांघवी यांनी उडी घेतली असून भाजपवर टिकास्त्र सोडले आहे.

काँग्रसचे खासदार असणाऱ्या सांघवींनी मुंबई तुंबण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दोषी ठरवले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये या दोघांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मुंबईमधील लोकांना त्रास सहन करावा लागत असून तो सहन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मुंबईतील लोकांना शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारने मुंबईमध्ये अंतर्गत जलवाहतूक सुरु केली’ असे ट्विट करत सांघवी यांनी भाजप सरकारला टोमणा मारला आहे.

मुंबईमध्ये अद्याप पाऊस सुरुच असून पुढील १२ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आज सकाळपासून मुंबईत पाणी साठू लागताच काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून या तुंबलेल्या मुंबईसाठी एकमेकांकडे बोटे दाखवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रसनेही सकाळी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत ५३ कोटी रुपये खर्च करुन मुंबई तुंबलीच कशी असा सवाल केला आहे.

पाणी साचल्यामुळे मुंबईतल्या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आज सकाळपासूनच मुंबईमध्ये दिसतं होतं. काल रात्रीपासूनच होणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साठले. मुंबईतील सर्व सबवेमध्ये पाणी साचले. यामध्ये प्रामुख्याने खार, अंधेरी, मालाड सब-वेचा समावेश होता. तसेच परळ, हिंदमाता, किंग्स सर्कल, भायखळा पोलीस स्टेशन परिसर, सायन, कुर्ला, चेंबूरमधील सखल भागातही सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला असून पाणी साचल्याने बेस्ट बसेसच्या मार्गातही बदल करण्यात आले.