मुस्लिम मतदारांमध्ये एम.आय.एम.चे आकर्षण वाढत असताना आरक्षणाच्या मुद्यावर या वर्गाची सहानुभूती मिळविण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, आरक्षणाचा आदेश रद्द करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली असताना भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्याला मात्र बगल दिली होती. त्यातच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय कायमचा निकालात काढण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. संजय निरुपम, नसिम खान, अमिन पटेल, आस्लम शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले, तर पाच टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द करून भाजप सरकारने आपण मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा संदेश दिल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आरक्षणाचा निर्णय रद्द करून सरकारने अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. या मुद्दय़ावर राष्ट्रवादी आक्रमक होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एम.आय.एम.चे दोन आमदार निवडून आले, तर काही मतदारसंघांमध्ये या पक्षाच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. यावरून मुस्लिम मतदारांनी एम.आय.एम.चा पर्याय स्वीकारल्याचे चित्र समोर आले होते. हा कल कायम राहिल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपली हक्काची व्होटबँक गमवावी लागेल. हे ओळखूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यात अल्पसंख्यांक समाजाची मते काँग्रेससाठी महत्त्वाची आहेत. विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये एम.आय.एम.चा एक आमदार निवडून आला, तर दुसऱ्या उमेदवाराला चांगली मते मिळाली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता नवे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर भाजपला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

मुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?