मुंबई : मुस्लिम बहुल व समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भिवंडी- निजामपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि समाजवादी यांनी तीन पक्षांनी ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत असून समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख हे येथे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.
भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२ आणि समाजवादीचे ६ असे ४८ नगरसेवकांचे निवडून आले आहेत. ९० नगरसेवकाच्या या महापालिकेत महापौर पदासाठी ४६ च्या जादुई आकड्याची गरज आहे. सपा आमदार रईस शेख यांच्या पक्षाचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले असताना येथील महापौर मात्र शेख म्हणतील तो होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन हे फ्रंटचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे सोहेल गुड्डू हे सहसंयोजक आणि सपाचे आमदार रईस शेख हे संयोजक आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपा आमदार रईस शेख आणि प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष उद् भवला होता. परिणामी, शेख यांच्या ३० कार्यकर्त्यांनी काँग्रेसची तर १२ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवार मिळवली होती. आमदार शेख यांनी ती या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली होती. त्यापैकी ३६ कार्यकर्ते निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे ३० नगरसेवक विजयी होऊनही भिवंडी महानगरपालिका सभागृहाची चावी आमदार रईस शेख यांच्या हाती आहे.
महानगरपालिका निवडणुकीत येथे समाजवादी पक्षाला झटका बसला आहे. निवडणुकीत राज्यात सर्वत्र समाजवादीचे पानिपत झाले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी दोन पावले मागे येत भिवंडीमधील पक्षाचे नेतृत्व आमदार रईस शेख यांच्या होती सोपवले आहे. आश्चर्य म्हणजे तसे प्रसिद्धी पत्रक अबु आझमी यांनी जारी केले आहे.
धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत आघाडीचा महापौर बसवणे हे ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चे उद्दिष्ट आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशक विकास यासाठी आमची फ्रंट कटिबद्ध आहे. भिवंडीकरांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल दिला आहे. भिवंडीकरांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी फ्रंट कायम प्रयत्नशील असेल. -रईस शेख, संयोजक, भिवंडी सेक्युलर फ्रंट आणि सपा आमदार
कोण आहेत रईस शेख
आमदार रईस कासम शेख हे ‘भिवंडी पूर्व’ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे गटनेते होते. अनेक वर्षे ते स्थायी समिती सदस्य राहिले आहेत .२०१२ मध्ये गोवंडी आणि २०१७ मध्ये नागपाडा येथून ते नगरसेवक हाेते. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रईस शेख यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रूपेश लक्ष्मण म्हात्रे यांचा पराभव केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष शेट्टी यांचा ५२,०१५ मतांनी पराभव केला.
