मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्र, केरळ व गुजरात या तीन राज्यांना बसला. राज्यातील कोकण विभागात मोठे नुकसान झाले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा पाहणी दौरा केला व त्याच राज्याला एक हजार कोटी रुपयांची तातडीची मदत दिली, महाराष्ट्राची मात्र उपेक्षा केली, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

या संदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, पंतप्रधानांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची जशी गुजरातची हवाई पाहणी केली, तशीच ती महाराष्ट्राचीही करायला हवी होती. गुजरातला मदत केली, तशी महाराष्ट्रालाही करायला हवी होती. तौक्ते चक्रीवादळाने केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यांत थैमान घातले. पंतप्रधानांनी महाराष्ट्राची विचारपूसदेखील केली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.