सांगली महापालिका निवडणुकीच्या रणांगणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद थेट मुंबईत उमटले असून नारायण राणे, पतंगराव कदम आणि थेट मुख्यमंत्र्यांवरही राष्ट्रवादीने आक्रमकपणे केलेल्या टीकेमुळे काँग्रेसमध्ये बेचैनी पसरली आहे. आर. आर. पाटील आणि अजित पवार यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारल्याने, राष्ट्रवादीचा हिशेब चुकता करा, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन असे वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगलीत केले होते. अजित पवार यांनी सांगलीतच त्याचा संदर्भ देत नारायण राणे यांचा नामोल्लेख टाळून नवा जोरदार हल्ला चढविला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्याच तोंडून नारायण राणे यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप करणारे वक्तव्य उमटल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या विश्वासार्हतेलाच धक्का पोहोचत असून मुख्यमंत्र्यानी याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी भावना काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे. गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल मांडी कापून घ्यायचे ठरवले, तर आर. आर. पाटील यांना मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीनंतर दर आठवडय़ाला मांडी कापावी लागेल, असे सांगत अजित पवार यांनी मंत्रिमंडळातच गुन्हेगार असल्याचे संकेत दिले. काँग्रेसच्या नेत्यांवर भरभरून तोंडसुख घेताना अजित पवार यांचा मुख्य रोख नारायण राणे यांच्याकडेच होता. चेंबूरच्या टोळीचा इतिहास आजही गृहखात्याकडे आहे, असे सांगत पवार यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले होते.
राष्ट्रवादीवर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांनी आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा असा सल्लाही पवार यांनी दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराडची नगरपालिका ताब्यात ठेवता आली नाही, असा टोला त्यांनी हाणला, तर पतंगराव कदम यांनी कुठे आणि कशा जमिनी मिळविल्या ते बाहेर काढले तर अवघड जाईल असा इशाराही दिला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावरही पवार यांनी जोरदार तोंडसुख घेतले. रात्रंदिवस लाल दिव्याची स्वप्ने पडत असल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करतात, अशी टीका त्यांनी केली. अजित पवार यांच्या चौफेर टोलेबाजीला पुन्हा एकदा बहर आल्याने आता उभय पक्षांत नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या या टीकास्त्राने काँग्रेस पुरती घायाळ झाली असून आता काँग्रेसकडून अजितदादा आणि आर. आर. यांच्यावर पलटवार होणार अशी चर्चा आहे. राज्यात सत्तेवर असलेले दोन पक्ष एकमेकांवर चिखलफेक करून मंत्र्यांच्याच कारभाराची लक्तरे बाहेर काढत असल्याने, विरोधी पक्षांत आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. या उखाळ्यापाखाळ्या अशाच सुरू राहिल्यास सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी विरोधकांची गरजच नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मनातील आनंदाच्या उकळ्यांना वाट करून दिली.

सांगलीत आज मतदान : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसची सूत्रे माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे तर राष्ट्रवादीची सूत्रे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आहेत. मदन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. तर जिल्ह्याच्या नेतृत्वावरून जयंत पाटील यांच्यासाठी ती प्रतिष्ठेचे ठरली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही काँग्रेसने चुरशीने प्रचारात रंग भरला आहे. विरोधी पक्षांनीही स्वाभिमानी विकास आघाडीच्या छत्राखाली या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. या मतदानासाठी संवेदनशील दहा प्रभागाबरोबरच शहरात सर्वत्र कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.