मुंबई : महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागूकरण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. तीनऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत गुरुवारी  करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक   टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे जातीय, धर्मांध शक्तींविरोधात पूर्ण ताकतीनिशी लढून महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचा ठराव  करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

नागरिकांनी न्यायालयात जावे : राज ठाकरे</strong>

नाशिक : सत्ता काबीज करण्यासाठी महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा घाट घातला जात आहे. या माध्यमातून निवडणुकीचे व्यवस्थापन केले जाते. देशात कुठेही अशी पद्धत नाही. निवडणूक आयोगाने कारवाई करावी. नागरिकांनीही या विषयावर न्यायालय आणि आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले.