आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांबरोबर महाआघाडी करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली असली, तरी आघाडीत मोठय़ा भावाची भूमिका म्हणजेच जास्त जागा मिळाव्यात अशी पक्षाची अपेक्षा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, हुसेन दलवाई आदी नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीने आघाडीची तयारी दर्शवितानाच निम्म्या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसनेही जादा जागांची अपेक्षा व्यक्त केल्याने आघाडीत जागावाटपाचा घोळ नेहमीप्रमाणे सुरू राहील, अशी चिन्हे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस २६ तर राष्ट्रवादीने २२ जागा लढविल्या होत्या. हेच सूत्र कायम राहावे, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नव्हती. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेताना काँग्रेसने अ, ब, क अशी मतदारसंघांची श्रेणी विभागणी केली आहे. काँग्रेसला १५५ ते १६० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. भाजपला पराभूत करण्याकरिता समविचारी पक्षांना एकत्र आणून महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. भाजप सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविणारे भाजपचे  नेते आता  दलित चळवळीला नक्षलवादाशी जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला.