भाजपला मुंबईपेक्षा गुजरात अधिक प्रिय

वित्तीय केंद्रात मुंबईला डावलले; काँग्रेसचा आरोप

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वित्तीय केंद्रात मुंबईला डावलले; काँग्रेसचा आरोप

मुंबई ही देशाची वित्तीय राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईत सुरू होणे क्रमप्राप्त होते. पण केंद्रातील भाजप सरकारने गुजरातच्या वित्तीय केंद्राला प्राधान्य दिले आहे. यावरून भाजपला मुंबईपेक्षा गुजरातचे जास्त प्रेम असल्याचे सिद्ध होते, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

गुजरातमधील गिफ्ट सिटीमधील वित्तीय केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावरच मुंबईतील वित्तीय केंद्राचा विचार करता येईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गेल्याच आठवडय़ात लोकसभेत स्पष्ट केले. यावरून मुंबईतील वित्तीय केंद्र सुरू होण्यास आणखी विलंब लागणार आहे. ही वस्तुस्थिती असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मुंबईतील वित्तीय केंद्र लवकरच सुरू होणार असे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

केंद्र सरकारकडून परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच वांद्रे-कुर्ला संकुलात पुरेशी जागा उपलब्ध नाही असे रडगाणे मुख्यमंत्र्यांनी सुरू केले आहे. नवी मुंबईच्या पर्यायाचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत वित्तीय केंद्राबाबत गुजरातमधील केंद्र सुरू झाल्यावर विचार करता येईल या जेटली यांच्या विधानावरून केंद्राची भूमिका स्पष्ट आहे. मग खोटीनाटी आश्वासने देऊन राज्यातील भाजप सरकारने जनतेला खोटी माहिती देत असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हट्टापायीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केल्याची टीकाही सावंत यांनी केली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress party comment on bjp

ताज्या बातम्या