देशभरात पक्षाला गळती; गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली पराभवांची मालिका खंडित होत नसल्याने तसेच राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची यादी वाढतच चालली आहे. यामुळे सध्या काँग्रेसची अवस्था बुडत्या नौकेसारखी झाली आहे. दुसरीकडे राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केलेल्या गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरू झाले असले तरी कामत आपल्या निर्णयाचा कधीच फेरविचार करीत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता निर्णय फिरविण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेमंत बिस्वा सरमा (आसाम), अरुणाचल प्रदेशमधील असंतुष्ट आमदार विजय बहुगुणा व हरकसिंग रावत (उत्तराखंड), अजित जोगी (छत्तीसगड) यांच्यासह गुरुदास कामत यांनी पक्ष सोडला आहे. कामत यांच्या पाठोपाठ गोव्यातील तीन पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांवर आरोप करीत पक्षाला रामराम केला.आणखी काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.मुंबईतील पक्ष संघटनेत महत्त्व दिले जात नसल्यानेच संतप्त झालेल्या कामत यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना झुकते माप दिल्याने कामत नाराज होते. कामत यांनी राजकीय संन्यासाची घोषणा मागे घ्यावी म्हणून काँग्रेसमधून प्रयत्न सुरू झाले आहेत. राजकारणातून संन्यास घेतला तरी  समाजकार्य सुरूच राहील, असे कामत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुंबईतील ब्लॉक अध्यक्षांची निवड करताना निरुपम यांनी कामत गटाच्या कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवले होते. यावरूनच विलेपाल्र्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आज निरुपम यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधींकडून दखल

कामत हे कॉंग्रेस कुटुंबाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी सांगितले. राजकीय घडामोडींची दखल घेत राहुल गांधी हे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर बदल करणार असून, याबाबत पक्षनेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कामतांची माघार कठीण

आतापर्यंत केंद्रीय मंत्री, अ. भा. युवक काँग्रेस, मुंबई काँग्रेस अशा पदांचा राजीनामा दिल्यावर त्या निर्णयाचा फेरविचार करण्यास त्यांनी ठाम नकार दिला होता. या पाश्र्वभूमीवर राजकीय संन्यासाच्या घोषणेचा फेरविचार करण्याची शक्यता कमीच आहे. कामत यांनी सारे नियोजन करून हा निर्णय घेतला असावा, असे पक्षात बोलले जाते. कामत यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्या समर्थकांनी चेंबूर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले. पण कामत कोणालाच भेटले नाहीत. अगदी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी कामत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्कच झाला नाही.