भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्दय़ावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्ययावत वॉर रूमचे उद्घाटन रविवारी खर्गे यांच्या हस्ते झाले.

अद्ययावत वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मीडियावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे.

आरेमधील वृक्षतोडीबाबत बोलताना, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणाऱ्या मुंबईकरांना, तरुण विद्यर्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे असा आरोप खर्गे यांनी केला.