मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की नाही, या विषयावरील चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने नारायण राणे यांना उमेदवारी नाकारली असून, भाई जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. कुडाळ आणि वांद्र पूर्व या दोन्ही निवडणुकीत तेथील मतदारांनी नारायण राणेंना नाकारले होते. आता काँग्रेसनेही त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे काय करणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या जागेसाठी मुंबईतून उमेदवारी मिळावी, यासाठी नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. त्यांनी पक्षातील विविध नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. विधान परिषदेत काँग्रेसला आक्रमक नेत्याची गरज आहे. त्यामुळे पक्षाने योग्य विचार करून निर्णय घ्यावा, असे सूचक वक्तव्य त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाते का, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र, काँग्रेसने मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाई जगताप यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. भाई जगताप सोमवारी दुपारीच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नारायण राणे यांना आता विधान परिषदेवर जाण्यासाठी जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जुलैमध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होते आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणुकीतही काँग्रेसने त्यांना संधी दिली होती. मात्र, तिथेही त्यांना शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.