मुंबई : महाविकास आघाडी म्हणून मित्र पक्ष अडचणीत येईल, असे कोणतेही विधान आम्ही केलेले नाही. काँग्रेसला मित्र पक्षाचे नुकसान करायचे असेल, तर त्यांनी तसे करावे. २०१४ ला काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे सत्ता गेली. केंद्र आणि राज्यात आम्ही मित्र पक्षांशी चांगले संबंध ठेवले आहेत. आम्ही स्वार्थी राजकारणी नाही, विजय वडेट्टीवार स्थानिक पातळीवर कुणासोबत काय तडजोडी करतात. याची चर्चा राज्यभर सुरू असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करणाऱ्यांना काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी समज द्यावी. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावरील टीका आम्ही सहन करणार नाही. सुळे यांनी ओबीसी दाखला घेतला, अशी टीका वडेट्टीवार यांनी का केली, हे त्यांनाच विचारा. ओबीसी – मराठा समाजात जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. प्रसिद्धीसाठी वडेट्टीवार यांनी आमच्यावर टीका करू नये. वडेट्टीवार यांनी सुळे यांची माफी मागितली, हे चांगले झाले. यापुढे त्यांच्याकडून मित्र पक्षाचा सन्मान केला जावा, अशी आमची अपेक्षा आहे.
रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे स्वागत करण्यात काहीच गैर नाही. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्याचे स्वागत करणे चुकीचे नाही. रोहित पवार काँग्रेसच्या जवळ जात आहेत, असे म्हणता येणार नाही. राहूल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला, याचा अर्थ राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे, असे होत नाही, असेही शिंदे म्हणाले.
राज्यात २०१४ ला आघाडीची सत्ता असताना आमच्या पक्षाची, पक्ष्याच्या नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच २०१४ मध्ये आमची सत्ता गेली. परस्पर टीका करू नये, या बाबत मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी बोलणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
