“फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे, हिंमत असेल तर…!” काँग्रेसचं भाजपाला आव्हान!

पंढरपूरच्या वारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.

sachin sawant targets bp
राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने ही जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केला
काँग्रेसनं महाविकासआघाडी सरकारमध्ये असूनही स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं विरोधी पक्ष असलेल्या भाजपावरही आगपाखड सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेतल्याच मित्रपक्षांना अंगावर घेतलं असताना प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्ष भाजपावर सातत्याने निशाणा साधला आहे. यंदा पंढरपूरच्या वारीला परवानगी देण्यावरून भाजपाने राज्य सरकारवर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. “हे फक्त हीन पातळीचं राजकारण सुरू आहे. हिंमत असेल, तर मोदींविरुद्ध बोला. कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?” असा सवाल देखील सचिन सावंत यांनी काँग्रेसकडून भाजपाला केला आहे.

दुटप्पीपणा तो हा!

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमधून पंढरपूरच्या वारीवरून भाजपाला सुनावलं आहे. “अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरत आहे. दुटप्पीपणा तो हा! धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाला वारीशी आणि वारकऱ्यांच्या जिवाशी घेणंदेणं नाही. फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे आहे. हिंमत असेल तर मोदींविरुद्ध बोला. कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?” असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

 

भाजपानं धारकऱ्यांची काळजी घ्यावी!

याआधी देखील सचिन सावंत यांनी ट्वीटरवरून भाजपाला लक्ष्य केलं आहे. “धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाने पायी वारीचा आग्रह धरला आहे! भाजपाला वारकऱ्यांच्या जिवाशी देणंघेणं नाही. यांनी कुंभमेळ्यात जनतेचा जीव धोक्यात घातला आणि मंदिर उघडण्यासाठीही राजकारण केलं. भाजपाने धारकऱ्यांची काळजी घ्यावी, मविआ सरकार वारकऱ्यांची काळजी घेण्यास समर्थ आहे”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं होतं.

 

राज्यपालांचाही पाठिंबा!

दरम्यान, पंढरपूरपर्यंत पायी वारी नेण्याच्या आग्रहाला खुद्द राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची यासंदर्भात भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दूरध्वनी करून सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा, अशा सूचना दिल्यावर मुख्य सचिवांनी तातडीने या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्य सरकारने यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress sachin sawant challenges bjp on pandharpur wari amid corona in maharashtra pmw

Next Story
आघाडीत फूट अशक्य! संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी