मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (२२ मे) आपल्या पुण्यातील सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत गंभीर आरोप केले. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलेल्या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता दुसरं तिसरं कोणी नसून भाजपा आहे, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं. त्यांनी व्हिडीओ ट्वीट करत आपली भूमिक स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन सावंत म्हणाले, “राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात ‘अयोध्या द ट्रॅप’ या चित्रपटाची गंभीर कहाणी सांगितली आहे. या कहाणीचा रचेता भाजपा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं आहे. जर अयोध्येला गेलो असतो, तर कार्यकत्यांना जेलमध्ये सडवलं असतं. उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडी सरकार नसून योगी आदित्यनाथ यांचे भाजपाचे सरकार आहे. तिथे भाजपाचाच खासदार विरोध करत आहे. तेव्हा तिथे रसद पुरवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो भाजपाचाच असू शकतो असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.”

“उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की”

“जे आम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे ते सत्य आहे हे राज ठाकरे यांनी मान्य केलं आहे. मनसेची कुचंबणा करण्याचं काम भाजपाने केलं आहे. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली आहे. भाजपा कोणते कुटील कारस्थान रचू शकतो हे या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या कहाणीमुधून निश्चितच समोर आलं असेल,” असंही सचिन सावंत यांनी नमूद केलं.

“अयोध्या दौऱ्याविरोधात रसद महाराष्ट्रातून हा आरोप थेट फडणवीसांवर”

सचिन सावंत यांनी आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं, “मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो, तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने तिथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. हा भाजपाचाच ट्रॅप आहे हे राज ठाकरे यांचेही मत आहे. भाजपा खासदारानेच विरोध केल्याने अयोध्या दौऱ्याविरोधात रसद महाराष्ट्रातून हा आरोप थेट फडणवीसांवर आहे. मात्र, मोदींकडे मागणी हा केमिकल लोच्या आहेच.”

“हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधी…”

“राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले, पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केली,” असाही आरोप सचिन सावंत यांनी त्यांच्या २० मे रोजीच्या ट्वीटमध्ये केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin sawant comment on raj thacekray ayodhya visit remark in pune speech pbs
First published on: 22-05-2022 at 14:33 IST