महाराष्ट्रात काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी सातत्याने भाजपावर टीका करण्याची, निरनिराळे घोटाळे समोर आणण्याची भूमिका पार पाडली आहे. अशा वेळी भाजपाला लक्ष्य करण्यात सचिन सावंत हे कायमच आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, मंगळवारी महाराष्ट्र काँग्रेसकडून पदभारांमध्ये बदल करत सचिन सावंत यांच्याकडे फक्त प्रवक्तेपद ठेवलं, तर अतुल लोंढे यांच्यावर मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत नाराज असल्याची जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळाली. त्यापाठोपाठ आज संध्याकाळी सचिन सावंत यांनी वर्षावर जाऊन थेट शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

प्रदेश काँग्रेसने नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यात लोंढे यांची मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. राजकीय कार्यक्र माची जबाबदारी  हुसेन दलवाई व गणेश पाटील, पक्षाच्या विविध आघाड्या व विभागांची जबाबदारी अलीकडेच भाजपमधून पक्षात दाखल झालेल्या डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. सचिन सावंत हे राज्यातील भाजप सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असत. त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले होते.  नव्या रचनेत फक्त प्रवक्ते पदी कायम ठेवण्यात आल्याने सावंत यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाकडे केली.