मुंबई: मुंबईप्रमाणेच चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेचाही तिढा सुटलेला नाही. याठिकाणी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीची आवश्यकता असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महपौर निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे गटाकडून अडीच वर्ष महापौरपद आणि स्थायी समितीची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपाबाबत वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटात सहमती घडून आल्यानंतर चंद्रपूरमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला. वडेट्टीवार यांनी आज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत ठाकरे गटाच्या ६ आणि वंचित बहुजन आघाडीच्या २ नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.
काँग्रेसच्या या प्रस्तावावर ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत वडेट्टीवार यांच्याशी पुढील चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वडेट्टीवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेटघेऊन त्यांना ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील दिला.
परभणीत ६५ नगरसेवकांत शिवसेनेचे (ठाकरे) २५ नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. सत्तेसाठी ठाकरे गटाला या ठिकाणी काँग्रेसची आवश्यकता आहे. त्यामुळे चंद्रपुरात ठाकरे गटाने पाठिंबा द्यावा, परभणीत काँग्रेस पाठिंबा देईल, असे गणित काँग्रेसकडून मांडण्यात आले आहे. यावर बोलताना चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर व्हावा, याला आपले प्राधान्य आहे. अकोला आणि परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसची मदत लागणार आहे. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसला ठाकरे यांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. याबाबत चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल, असे वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
