“भाजपा खोटारडा, विखारी, कांगावाखोर पक्ष”, Toolkit प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड!

वादग्रस्त टूलकिटप्रकरणावरून भाजपाने केलेल्या आरोपांना सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

congress sachin sawant on toolkit bjp atul bhatkhalkar

देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यानंतर आता काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर दिलं असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये आगपाखड केली आहे. “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

भातखळकरांचे परखड शब्दांत आरोप!

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संबंधित टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसला सुनावलं होतं. “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा, असे आदेश यातून काँग्रेसनं कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते. वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते”, असं अतुल भातखळकरांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सचिन सावंत यांचं भातखळकरांना प्रत्युत्तर!

दरम्यान, आता त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपा हा अत्यंत खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे. सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसतर्फे जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचं नावही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे”, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. अतुल भातखळकर यांच्या ट्वीटवर त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

 

अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलेल्या टूलकिटवर उजव्या कोपऱ्यात काँग्रेसचा लोगो दिसत आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याची ही संधी आहे असं नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबतच करोना व्हायरसचा उल्लेख सोशल मीडियावर करताना करोनाचा भारतीय स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन असा करण्याबाबत देखील उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे टूलकिटच बनावट असल्याचा दावा आता काँग्रेसकडून भाजपाच्या आरोपावर करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress toolkit sachin sawant slams bjp atul bhatkhalkar on allegations pmw

ताज्या बातम्या